सातारा : जावळी तालुक्यातील वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक, ट्रेकर आणि गडप्रेमी येत असतात. मात्र, अलीकडेच वन विभागाने वासोटा किल्ला पर्यटनासाठी प्रति व्यक्ती प्रवेश शुल्कात वाढ केली असून, या निर्णयामुळे स्थानिक व्यवसायिक आणि गडप्रेमी वर्गात संताप उसळला आहे.
पूर्वी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 30 रुपये इतके होते. परंतु आता वन विभागाने ते 150 रुपये प्रति व्यक्ती केले आहे. ही वाढ कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे करण्यात आली, असा थेट सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे. स्थानिक बोट चालक, हॉटेल व्यवसायिक आणि गाईड यांचे म्हणणे आहे की, “वासोटा किल्ला पर्यटन हाच आमचा प्रमुख रोजगाराचा स्रोत आहे. आधीच कास पठार ते बामणोली मार्गावरचा रस्ता अतिशय खराब स्थितीत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक परत फिरतात. त्यात प्रवेश शुल्क वाढल्याने पर्यटनावर आणखी विपरीत परिणाम होईल.”
गडप्रेमी सांगतात की, “वन विभागाने कोणताही अभ्यास न करता अचानक शुल्कवाढ केली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली वारंवार वाढ होत असून, या वाढीमुळे सामान्य गडप्रेमी आणि ट्रेकर यांचा उत्साह कमी होत आहे.”
याबाबत वन विभागाकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, शुल्कवाढ ही “व्याघ्र प्रकल्पाच्या देखभाल आणि सुरक्षा खर्च वाढीमुळे” करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांकडून आता ही मागणी होत आहे की, “शुल्कवाढ तात्काळ मागे घ्यावी, आणि त्याआधी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची व पायाभूत सुविधांची सुधारणा करावी.”
महत्त्वाचे मुद्दे: -वन विभागाने प्रवेश शुल्क 30 वरून 150 रुपये केले. स्थानिकांचा आरोप – कोणताही शासन निर्णय न दाखवता वाढ, खराब रस्त्यांमुळे पर्यटन घटतेय, -व्यवसायिक, बोट चालक आणि गडप्रेमी वर्गात संताप.