कोरेगाव : चिमणगाव, ता. कोरेगाव येथे गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेली टोळी जागरूक नागरिकांमुळे पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात दरोड्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून रविवारी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र जयसिंग सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मल्हारी शिवाजी मदने, साहिल कांतीलाल पाटोळे आणि ऋतुराज मारुती जाधव (सर्वजण रा. वनवासवाडी बुध, ता. खटाव) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण एका दुचाकीवरून चिमणगाव येथे आले होते.
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्याजवळ एक कोयता, एक चाकू, मिरची पूड जवळ बाळगली होती. दरोडेखोरांची चाहूल लागताच जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रितसर रिचार्ज अटक करण्यात आली. कोरेगाव न्यायालयात त्यांना हजर केले असता कोठडी देण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या आहेत.