सातारा : येथील राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या भाजी मंडईत तीन भामट्यांनी सोन्याचे बनावट बिस्किट देऊन, शांताबाई भाऊ देवकर (वय 60, रा. देवकरवाडी, पो. निगडी, ता. सातारा) यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लुटले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंडई परिसरात सोन्याचे बिस्कीट सापडले आहे. ते आपण सर्व जण वाटून घेऊ, असे सांगून तीन भामट्यांनी शांताबाई देवकर यांच्याकडे पैशांची मागणी केली. एवढी रक्कम जवळ नसल्याने देवकर यांनी गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून त्यांच्याकडे दिले. त्या बदल्यात भामट्यांनी सोनेरी रंगाचे खोटे बिस्किट देवकर यांना देऊन, पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देवकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.