सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोख स्वरूपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातून ११ लाख रुपये मदत जमा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत रोख स्वरूपात जमा केली जाणार असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता दिली.
मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यावेळी उपस्थित होते. खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार पक्षाने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरातून रोख स्वरूपात मदत जमा करण्यात आलेली आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून मदत जमा केली जाईल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.