दहिवडी : चंदनाचे झाड चोरल्याच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या व तीन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस शिताफीने पकडण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे. याबाबतची माहिती अशी, की राणंद (ता. माण) येथील जगदाळे वस्तीवर राहणाऱ्या शरद लक्ष्मण चव्हाण यांच्या शेताचे बांधावर असलेले चंदनाचे झाड २१ डिसेंबर २०२० मध्ये रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सूर्यकांत संपत खरात (रा. खरात वस्ती दहिवडी, ता. माण) हा चोरी करताना सापडला होता. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक मल्हारी हांगे यांनी करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र पाठविलेले होते. दहिवडीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. थोरात यांनी सहा मे २०२२ ला सूर्यकांत खरात याला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले होते. त्याला एक महिना सश्रम कारावास तसेच ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास पुढे दोन दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती; परंतु न्यायालयाने शिक्षा सुनावल्यापासून सूर्यकांत खरात हा सुमारे तीन वर्षे एक महिना २८ दिवस फरारी होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलिस हवालदार विशाल वाघमारे यांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.