खंडाळा : खंडाळा शहरातून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह खंडाळ्यातील कचरा डेपोलगत असणाऱ्या तलावात आढळून आला. साहिल उत्तम चौधरी (वय 19, रा. खंडाळा) हा सुमारे आठवड्याभरापासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस स्टेशनला दाखल केली होती.
रविवार, दि. 26 रोजी खंडाळा शहरातील कचरा डेपोलगत असणाऱ्या गोट्या म्हसोबा तलावामध्ये एक मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिरवळ रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस अंमलदार अशोक जाधव, संजय जाधव, सुरज पवार उपस्थित होते. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पोलीस अंमलदार संजय जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
