कोरेगाव : प्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा-फलटणला पाणी सोडण्यात आल्याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदेशीरपणे पाणी विसर्ग होत असल्याचा निषेध करत हे पाणी त्वरित बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की धोम धरणातून आपण शनिवारी (ता. दहा) सकाळी आठ वाजता खंडाळा व फलटणसाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी सोडले आहे. वास्तविक, ज्या परिसरातून पिण्याच्या पाण्याची मागणी केली जात आहे, त्या परिसरात ऊसशेती आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ऊस शेतीसाठीच पाणी सोडले जात आहे.
या भागात पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्वापार नीरा नदीतून आहे. या खोऱ्यात नीरा- देवघर, भाटघर, वीर यासारखी धरणे आहेत व त्यातून अनेक पेयजल पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. तरीही केवळ राजकीय आकसाने धोम धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बलकवडी कालव्यातून सोडण्यात आले आहे.
मुळात २.७० टीएमसी पाण्याची तरतूद असताना बेकायदेशीररीत्या आधीच ४.८० टीएमसी पाणी नेले आहे आणि आता पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून, या कृतीस धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा विरोध आहे. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, सचिव नंदकुमार माने, सुधाकर बर्गे, जगदीश पवार, सत्यवान भोसले यांच्या सह्या आहेत.