किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू -खासदार उदयनराजे भोसले

by Team Satara Today | published on : 03 November 2025


सातारा  : पर्यटनाच्या दृष्टीने महाबळेश्वर हे देशातील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ असून या पर्यटनस्थळाला दरवर्षी 18 ते 20 लाख लोक भेट देतात. प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतिक आहे.  या ठिकाणी सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने येत असतात. अनेकदा इच्छा असूनही लहान मुले, वयस्कर नागरिक यांना गडावर चढता येत नाही. त्यांच्यासाठी रोपवे, फर्निक्युलर यंत्रणा यांची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच सुसज्ज वाहन तळही आवश्यक आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला वन विभागाच्या खालोखाल प्रतापगड देवस्थानची जमीन आहे. या सुविधांसाठी  आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही खासदार तथा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  या बैठकीला प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे सह अध्यक्ष शंभूराज देसाई (दृरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य मिलिंद एकबोटे, नितीन शिंदे, शरद पोंक्षे,  सदाशिव टेंटविलकर, सोमनाथ धुमाळ,  चंद्रकात पाटील, विजय नायडू, अमोल जाधव, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतापगड हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे. प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतापगड किल्ला प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून या प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर सह अध्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई हे आहेत. या प्राधिकरणाची आज पहिली बैठक संपन्न झाली. प्रतापगड किल्ला जनत व संवर्धनासाठी 127 कोटी निधी मंजूर केला असून यामधून संवर्धनाची विविध कामे करण्यात येणार आहेत. 

प्रतापगड प्राधिकरणाचे बँक खाते उघडणे, निधी मागणी करणे, प्राधिकरणाकरिता कक्ष स्थापन करणे

प्रतापगड किल्ला (भाग-५) जतन, संवर्धन कामाच्या निविदेस मान्यता देणे, प्रतापगड किल्ला (भाग-६) जतन, संवर्धन कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता घेणे,  सदरील प्रकल्प सल्लागार नियुक्तीस व मानधन शुल्कास मान्यता देणे,  लाईट अँड साऊंड शो स्क्रिप्टला मान्यता देणे, आकस्मित खर्च मान्यतेसाठी सुधारीत शासन निर्णय काढणे,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्तीचित्रास मान्यता देणे, आराखड्‌यातील उर्वरित कामाचे नियोजन केलेले नकाशे व आराखडे तपासून मान्यता देणे,  प्रतापगड किल्ल्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विश्रामगृह (खोली) या विभागाकडे वर्ग करण्यास आदेशित करणे,  प्रतापगडाच्या पायथ्यालगत कमानीजवळील वाहनांसाठी जागा निश्चित करणे व विद्युत बस/ई-बस सुविधा कार्यान्वित करणे, प्रतापगड किल्ला भाग ४ च्या प्रथम व द्वितीय देयकास निधी प्राप्त होणेबाबत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनाला खूप महत्व आहे. सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वैविध्यपूर्ण असून या ठिकाणी असणाऱ्या महत्वाच्या पर्यटन स्थळांना लाखो लोक भेटी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादी नोंद करण्यात आली आहे. त्यात प्रतापगड किल्ला अत्यंत ऐतिहासिक प्रतापगड किल्ला अत्यंत महत्वपूर्ण आहे. या किल्ल्याच्या विकासासाठी व पर्यटकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधिकरण कटीबद्ध असल्याचे सांगून खासदार श्री. भोसले म्हणाले, प्रतापगडाच्या संवर्धन, जनत व विकासासाठी आवश्यक प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असणारी जागा आवश्यकता भासल्यास प्रतापगड देवस्थानची जागा देण्यात येईल. यावेळी त्यांनी देवस्थानच्या मालकीचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असून येथे असणारी जुने, मोठे वृक्षांची तोड झाली आहे. वन विभागामार्फत तेथील वनराई, वृक्षराजी पुन्हा संवर्धीत करण्यात यावी, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

एकात्मिक पर्यटन आराखडा जिल्ह्यासाठी 381 कोटी 56 लाखाचा मंजूर करण्यात आला असून प्रतापगड जतन व संवर्धनासाठी 127 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, किल्ले प्रतापगडच्या आजूबाजुला जवळपास चौदा किल्ले आहेत. या चौदा किल्ल्यांना पार करुन प्रतापगडावर येणे हे शस्त्रु सैन्यासाठी दुरापास्त बाब होती. किल्ले प्रतापगडचे भौगोलिक स्थान पाहिले असता छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व युद्धनिती यातून अधोरीत होते. याची माहिती पुढील पिढीला होणे आवश्यक आहे.  यासाठी प्रतापगड जनता व संवर्धन विकास आराखडा राबविण्यात येत आहे.  या अंतर्गत विविध कामे होत असतांना किल्ल्याच्या मुळ ढाच्याला कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याची दक्षता घेऊनच किल्ल्याचे संवर्ध करण्यात येईल.यावेळी अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या सूचनांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
पुढील बातमी
मतदार याद्यांमधील दुबार नावाबाबत कार्यवाहीच्या सूचना; उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण

संबंधित बातम्या