शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट : प्रा. इंद्रजीत भालेराव

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by Team Satara Today | published on : 04 October 2025


सातारा  : शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदललेले नाही. रयत शिक्षण संस्था ही अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. स्थापनेपासून आजही शिक्षण हाच 'रयत'चा धर्म राहिला आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या १०६  व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे उपस्थित होते, याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, जे.के.जाधव,  प्रभाकर देशमुख,  सदाशिव कदम, भैय्यासाहेब जाधव, अरुण पवार,  प्रशांत पाटील, यशवंत पाटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना ते म्हणाले, " रयत शिक्षण संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आहे. स्थापनेपासून आजअखेर मूळ उद्देशानुसार चालणारी ही संस्था होय. महाराष्ट्रातील पुरोगामी समाजसुधारकांची एकत्रित सत्वे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन शिक्षण संस्थेला 'रयत' हे नाव दिले. देशाच्या विकासासाठी दृष्टी देणारे  नेतृत्व रयतकडे आहे. कर्मवीरांनी शिक्षणाला श्रमाची जोड दिली. कर्मवीर ही पदवी जनतेच्या मुखातून आलेली आहे. आज रयत शिक्षण संस्थेत जागतिक पातळीवरील उपक्रम सुरू आहेत.” यावेळी त्यांनी विविध गाजलेल्या कविता सादर केल्या. 'बाप', ‘जन्म’, 'गावकडं चल माझ्या दोस्ता' या कवितेवर उपस्थित विद्यार्थ्यांनी ठेका धरला.


चेअरमन चंद्रकांत दळवी संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना म्हणाले उत्साहाने काम करणारे शिक्षक हीच रयतची ताकद आहे. रयतच्या सर्व शाखेत इंटरऍक्टीव्ह पॅनल, कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, संस्थचे स्वतःचे डेटा सायन्स सेंटर इत्यादी नवीन धोरणाबद्दल माहिती दिली. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी रयत अकॅडमी सुरु करीत असल्याचे  यावेळी त्यांनी जाहीर केले.


संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ उपक्रमशील शाखा,  उपक्रमशील शिक्षक,  लाईफ वर्कर,  लाईफ मेंबर,  प्राचार्य,  आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी, विज्ञान शिक्षक,कार्यक्षम गुरुकुल प्रमुख इत्यादी  पुरस्कार देण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला. 


सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला इत्यादींची उपस्थिती होती. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद,आजीव सेवक, विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम बडतर्फ; मुंबई उच्च न्यायालयाचा कठोर निर्णय
पुढील बातमी
खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते दुर्गामाता सहस्त्रचंडी यागाला प्रारंभ; हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ

संबंधित बातम्या