रक्षक प्रतिष्ठानची गुटख्याविरोधात धडक कारवाई; पाठलाग करून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 28 December 2025


सातारा : जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठानने थेट मैदानात उतरून गुटख्याविरोधात धडक कारवाई करत पिकअप गाडींसह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

रविवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास नागठाणे परिसरातील काशीळ गावच्या हद्दीत कराडहून साताऱ्याच्या दिशेने येणारा पिकअप टेम्पो (क्रमांक एम.एच. ५१ सी १३८३) रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी व कार्यकर्त्यांनी गोपनीय माहितीनुसार पाठलाग करून अडवला. मात्र, वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

पिकअपमध्ये पांढऱ्या व खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये बंदी असलेला गुटखा आढळून आला.यानंतर पकडलेले वाहन बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला असता, अंदाजे ५ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी व त्यामध्ये १७५ किलो वजनाचा २ लाख ६७ हजार १३२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही संपूर्ण कारवाई रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून पुढील कठोर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




यंत्रणा झोपली आहे का?


सातारा जिल्ह्यात गुटखा विक्री पूर्णतः बंद करावी, अशी मागणी यापूर्वीच रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी प्रशासनाकडे केली होती. अन्यथा आम्ही स्वतः कारवाई करू, असा इशाराही देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

रक्षक प्रतिष्ठानला गुटखा वाहतुकीबाबत माहिती मिळते, मात्र पोलीस यंत्रणा व अन्न व औषध प्रशासन विभागाला याची कल्पना कशी नसते? संबंधित यंत्रणा झोपली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढील काळात गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकणार असून ज्या पोलीस हद्दीत गुटखा विक्री व वाहतूक सुरू आहे, त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुणवत्तेची उंची गाठेल - प्रा. मिलिंद जोशी; साहित्य संमेलनाचे नाव अन्‌ बोधचिन्ह दर्शविणारा फुगा आकाशी झेपावला
पुढील बातमी
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम बचावासाठी जिल्हा काँग्रेसचे रस्त्यावर उतरून आंदोलन; ५ जानेवारीपासून देशव्यापी मोहीम

संबंधित बातम्या