कोरेगाव : खडखडवाडी, ता. कोरेगाव येथील एका शेतात हार्वेस्टर चालक वेगाने रिव्हर्स घेत असताना हार्वेस्टरखाली सापडून एकजण जागीच ठार झाला. याप्रकरणी हार्वेस्टर चालकाविरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अरूण धर्माजी जाधव (वय 51) असे हार्वेस्टर अंगावरुन जावून ठार झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. तर प्रकाश नामदेव नावडकर (रा. राऊतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या हार्वेस्टर चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता खडखडवाडी येथील एका शेतात प्रकाश नावडकर हे हार्वेस्टर रिव्हर्सने मागे घेत असताना हार्वेस्टरची अरुण जाधव यांना जोराची धडक बसली. या धडकेत जाधव खाली पडले गेले. हार्वेस्टर वेगाने असल्याने तो त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. याबाबत ओमकार अरुण जाधव (रा. आंबवडे संमत कोरेगाव) यांनी फिर्याद दिली असून हार्वेस्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हवालदार सचिन साळुंखे करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
