वाई : राज्यात वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी तातडीने प्रभावी कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. या मागणीसाठी आज समितीचे सेवक व धर्मप्रेमी नागरिक वाई तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदारांना औपचारिक निवेदन देऊन शासनाने हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ मंजूर करावा, असा आग्रह व्यक्त करण्यात आला.
निवेदनात महिलांवर होत असलेल्या फसवणूक, शोषण व जबर धर्मांतराच्या प्रकरणांबद्दल तीव्र चिंता नोंदवण्यात आली आहे. राज्य शासनाकडून कठोर कायदा न आल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचा इशारा समितीने दिला. कायदा व सुव्यवस्था विभागाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याबरोबरच धर्मांतरण विरोधी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर करावा, अशा गुन्ह्यांवर जलद व निर्भीड कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, आवश्यक असल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही समितीने शासनाला दिला.