सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आज खेड जिल्हा परिषद गटातून विशाल गायकवाड यांनी आपला अर्ज दाखल केला असून आजअखेर एकूण 87 अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांनी दिली. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी सातारा पंचायत समिती येथे सुविधा करण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची विक्री जोरात सुरू आहे. सातारा तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट येत असून 16 पंचायत समिती गण आहेत. 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
अर्ज विक्रीची संख्या पाहता आगामी काळात आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून निवडणूक लढतीत मोठी चुरस निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रशासनाकडून अर्ज स्वीकारणे, छाननी, माघार व निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.
एकूणच सातारा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.