सातारा : सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक येथील शाहू कला मंदिरामध्ये सायंकाळी उशिरा पार पाडली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव सोहळ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत सामोपचाराने गणेशोत्सव सोहळा पार पाडणे, पारंपारिक वाद्यासह डॉल्बी आणि वाद्यांना परवानगी मिळणे, याबाबतच्या मागण्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या.
या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अभिजीत बारटक्के, अक्षय गवळी, विश्वजीत बालगुडे यांच्यासह सातारा शहरातील विविध मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सूचनांचा पाऊस पाडला. दरवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मिरवणूक विस्कळीत होते आणि पोलिसांकडून याबाबत विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा आग्रह धरला जातो. याबाबत कार्यकर्ता आणि पोलीस यांच्यात समन्वय हवा. त्या पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवा दरम्यान प्रदर्शित केल्या जाव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत पारंपारिक वाद्य आणि डॉल्बी मर्यादित चौकटीमध्ये वाजवण्यास परवानगी मिळावी, मिरवणुकीला शिस्त असावी, त्याचबरोबर गणेशोत्सव विसर्जन सोहळा देखील साधेपणाने पार पाडला जावा, अशा सूचना माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी केल्या.
गणेशोत्सव कार्यकर्त्यांना एक खिडकी योजनेचा लाभ होताना अनेक कागदपत्रांच्या त्रुटी राहून जातात. याबाबत सातारा नगरपालिकेने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा अक्षय गवळी यांनी व्यक्त केली.
सर्वच गणेश भक्त कार्यकर्ते म्हणून काम करत असतात. सर्वसाधारण मंडळे पर्यावरण पूरक गणपतीसह कायदेशीर नियमांचे पालन करत असतात. तरीसुद्धा पर्यावरणाचे नियम मंडळांनाच लावले जातात, अशी खंत अभिजीत बारटक्के यांनी व्यक्त केली.
मंडळाचे कार्यकर्ते सर्वांना उपयोगी येतात. समिती व मंडळाचे कार्यकर्ते यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. उगाच वादविवाद नकोत. सर्व गणेश मंडळे समान आहेत, अशी समन्वयाची भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. तसेच सातारा नगरपालिकेला दरवर्षी कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये 55 लाख लिटर पाण्याची सोय करावी लागते. नगरपालिकेने यासंदर्भामध्ये कायमस्वरूपी विसर्जन तलावाची व्यवस्था करावी. याबाबत लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.