सातारा : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमा निमित्त नवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
देशाच्या एकात्मतेसाठी अनेक संतांनी खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्राला संतांच्या प्रबोधनाचा समृध्द व गौरवशाली वारसा लाभला आहे. संत परंपरेने राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक एकात्मतेला भक्कम अधिष्ठान दिले आहे.
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे व कार्याचे स्मरण होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असा श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा शहीदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शीख सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव या समुदायाचे नागरिक सहभागी होणार असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होवून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना बळ देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.