शाहूनगरवासीयांना हवेय कास तलावाचे पाणी

विनाव्यत्यय स्वच्छ पाणीपुरवठ्याची अपेक्षा; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचाही होणार पाठपुरावा

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : सातारा शहरामध्ये नव्याने दाखल झालेल्या शाहूनगर भागासाठी विनाअडथळा सुलभतेने कास तलावाचे पाणी मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सततचा पाऊस, विजेचा लपंडाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे शाहूनगरची जनता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला वैतागली आहे. त्यामुळे सातारा शहराच्या या भागाला सुद्धा कास तलावाचे पाणी मिळावे याकरिता स्वतंत्र प्रस्तावाच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

सातारा शहराला कास धरण क्षेत्रातून 50 लाख लिटर उरमोडी पाणीपुरवठा संलग्न असणार्‍या शहापूर पाणीपुरवठा योजनेतून नऊ लाख व कण्हेर योजनेतून 11 लाख एम एल डी पाणीपुरवठा केला जातो. सातारा शहराच्या पूर्व भागाला असणार्‍या शाहूनगर, खेड, सदर बाजार व भोसले मळा या भागांना माहुली येथील कृष्णा उद्भव क्षेत्रातून पाणीपुरवठा केला जातो. या भागाला पाच एम एल डी पाणीपुरवठा करण्यासाठी सातारा पालिकेला वार्षिक दीड कोटी मोजावे लागतात. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे झालेले खाजगीकरण, कंत्राटदाराकडे प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभाव, विजेचा लपंडाव, पाणीपुरवठा वितरणातील तांत्रिक अडचणी यामुळे शाहूनगर परिसरात पावसाळ्यात पाणीटंचाईच्या व्यथा सुरू आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांची नागरिकांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सुरळीत पाणीपुरवठा विषयी चर्चा केली. शाहूनगर वासियांना कास तलावाचे पाणी मिळावे यासाठी एक प्रस्ताव आणि नागरिकांच्या मागण्या सादर कराव्यात, त्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला सादर केल्या जातील, असे आश्वासन वाघमारे यांनी दिले आहे.


शासन स्तरावर निर्णय होण्याची आवश्यकता

सातारा जिल्ह्याला मंत्रिमंडळामध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांच्या पदाने भक्कम प्रतिनिधित्व मिळाले आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांवर कायम लक्ष असते. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संयुक्त प्रयत्नाने सातारा शहराची हद्दवाढ जाहीर झाली. याबाबतच्या मंजुरीचे अधिकृत पत्र स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच आणले होते. शाहूनगर परिसरामध्ये साधारण दहा हजार लोकसंख्या असून साडेसात हजार नळ कनेक्शन आहेत. येथे कास तलावाचे पाणी मिळावे यासाठी नगर विकास विभाग व स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग या दोन स्वतंत्र विभागांच्या माध्यमातून समन्वय चर्चा होणे गरजेचे आहे. शासन स्तरावर याबाबत तातडीने निर्णय झाल्यास कास तलावाची स्वयंपूर्णता सिद्ध झाल्यावर शहापूर पाणी योजना आणि कास तलावाचे अतिरिक्त पाणी हे शाहूनगरला देणे शक्य आहे. याबाबत संघटनात्मक प्रयत्नांची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


सातारा पालिकेचे दीड कोटी रुपये वाचणार

कास धरणाच्या उंची वाढण्याचा मोठा फायदा सातारा शहराला झालेला आहे. त्याचबरोबर नवीन पाईपलाईन योजनेमुळे पाणीपुरवठ्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे शहापूर आणि कृष्णा उद्भव क्षेत्राचे अवलंबित्व कमी होणार आहे. शहापूर पाणीपुरवठा योजनेचे शिल्लक राहणारे नऊ एम एल डी पाणी हे शाहूनगरला दिले गेल्यास प्राधिकरणाचे जे पाणी पालिकेला विकत घ्यावे लागते त्याचे बिल वाचणार आहे. हे बिल वार्षिक तब्बल दीड कोटी रुपये इतके आहे. त्याची बचत झाल्याने सातारकरांना ते पाणी मिळेल आणि पालिकेच्या तिजोरीचा महसुलही सुरक्षित राहील, असा दुहेरी फायदा होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टपाल घोटाळा प्रकरणात खातेधारकांचे क्लेम चर्चेच्या फेर्‍यात
पुढील बातमी
कंत्राटदार महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या