नांदेड : सिनेमालाही लाजवेल असा एक भयंकर आणि तितकाच हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग नांदेडमध्ये घडला आहे. पोटच्या गोळ्याने ज्या मुलावर जीव जडला, त्याच मुलाचा बापाने आणि भावांनी मिळून निर्घृण खून केला. पण खरी थरारक घटना तर पुढेच घडली... प्रियकराचा मृतदेह दारात पडलेला असताना, प्रेयसीने टाहो फोडत त्याच्या रक्ताने माखलेल्या कपाळावर स्वतःच्या हाताने कुंकू लावले! "तो गेला तरी मी त्याचीच बायको आहे," असं सांगत तिने थेट आपल्याच जन्मदात्यांना फाशी देण्याची मागणी केली.
नांदेडच्या जुना गंज भागात गुरुवारी सायंकाळी रक्ताचा सडा पडला. सक्षम ताटे आणि आचल मामीलवार यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण हे प्रेम आचलच्या घरच्यांच्या डोळ्यात खुपत होतं. ‘माझ्या मुलीपासून लांब राहा’ अशी धमकी आधीच दिली गेली होती. पण प्रेम आंधळं असतं... आणि क्रूरताही! गुरुवारी मुलीचा बाप गजानन, भाऊ साहिल आणि हिमेश यांनी सक्षमला गाठलं. आधी गोळी झाडली आणि त्यानंतर डोक्यात फरशी घालून अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात सक्षमने प्राण सोडला.
सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणला गेला. एकीकडे सक्षमच्या आईचा आकांत सुरू होता, तर दुसरीकडे आचल धावत तिथे पोहोचली. प्रेतासमोर तिने जो आक्रोश केला, तो पाहून उपस्थितांची काळीजं फाटली. अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच आचल पुढे सरसावली. तिने हातात हळद-कुंकू घेतलं आणि सर्वांसमक्ष आपल्या कपाळात सक्षमच्या नावाचं सिंदूर भरलं. एवढंच नाही तर मृत सक्षमलाही हळद लावली. "माझं लग्न त्याच्याशीच झालंय, आता मी त्याचीच विधवा म्हणून इथेच राहणार," हा तिचा निर्धार पाहून अख्खं नांदेड सुन्न झालं.
"आई-बापाला जिवंत ठेवू नका"
ज्यांनी जन्म दिला, त्या आई-बापा विरोधातच आचल उभी राहिली आहे. तिने पोलिसांना सांगितलं, "माझं आणि सक्षमचं तीन वर्षांपासून प्रेम होतं. तो जेलमधून सुटून आल्यावर माझ्या घरच्यांनी कट रचून त्याला मारलं. आता मला न्याय हवाय. माझ्या बापाला आणि भावांना फाशीचीच शिक्षा द्या, तरच सक्षमच्या आत्म्याला शांती मिळेल." या प्रकरणी इतवारा पोलिसांनी तातडीने चक्रं फिरवत १२ तासांच्या आत मुलीचे वडील, दोन भाऊ आणि आईसह ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.