पक्षाची एकजूट कायम ठेवा : ना. शिवेंद्रराजे

by Team Satara Today | published on : 14 July 2025


सातारा  : काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून, कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी. पक्षाला घवघवीत यश मिळवून द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

कुडाळ, ता. जावली येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे, मारुती चिकणे, मच्छिंद्र मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाला मोठा विजय मिळवता आला. त्यामुळे विरोधकांना आपली ताकद किती आहे हे कळले आहे. हीच ताकद आपण येणार्‍या सर्वच अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत दाखवून द्यायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून सातारा-जावली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. 

कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लागली असून, पाचवड - खेड महामार्ग तसेच कुडाळ-पाचगणी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या माध्यमातून परिसरातील विकासाला बळ मिळणार आहे. त्याचबरोबर प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनाही दिलासा देण्याचे काम आपण सर्व मिळून करत आहोत. कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा कणा असल्याने पदाधिकार्‍यांसह तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला भाजप ताकद देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी नूतन तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संदीप परामणे यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबर अखेर काम पूर्ण करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
दुकानासमोर लिंबू, काळी बाहुली !

संबंधित बातम्या