सातारा : सातारा जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक यादरम्यानची सातारा-कोरेगाव रस्त्यावरील असणारी टपर्यांची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून हटवली. यामुळे या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा-कोरेगाव रस्ता अत्यंत वर्दळीचा असून त्याच्या लगतच फुटपाथवर अतिक्रमणे वाढल्यामुळे नागरिकांची अडचण होत होती. फळ विक्रेते, स्टॉलवाले, टपरी, हातगाडीवाले यांची मोठी अतिक्रमणे या रस्त्यावर झाली होती. या रस्त्यावर टपर्यांची पथारी थेट रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी सुरू झाली होती. तसेच वाहन चालकांना पार्किंगची अडचण येत होती. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्यावर कारवाई करत नव्हता. मात्र मंगळवारी दुपारी बारा वाजल्यानंतर जेसीबी, डंपर, 15 कर्मचारी आणि अभियंता विभागाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टपर्या काढण्यास सुरुवात केली.
या टपरी चालकांना पंधरा दिवसापूर्वी इशारा नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांच्या वतीने लेखी व तोंडी तक्रारी सातारा नगरपालिकेकडे झाल्या होत्या. मात्र रस्त्यांचे स्वामित्व आणि देखभाल दुरुस्ती या आस्थापना वेगवेगळ्या असल्यामुळे कारवाईची अडचण होत होती. सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती. सातारा शहर पोलिसांनी यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. काही ठिकाणी विक्रेते आणि कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. मात्र पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने अनेक टपरी चालकांनी आपल्या टपर्या स्वतःहून काढून घेतल्या. या परिसरातील हातगाडी, दुकानाचे फलक, लोखंडी अडथळे हटवण्यात आले. जेसीबी आणि ट्रॅक्टरचा या कारवाईसाठी वापर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत खैरमोडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. संबंधित अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसापूर्वीच याबाबतच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे पुन्हा अतिक्रमण झाल्यास पुन्हा ही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.