महाराष्ट्रात प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू ; जागतिक स्पर्धेमुळे पाचगणीच्या साहसी पर्यटनाला जागतिक स्तरावर नवे पंख

by Team Satara Today | published on : 23 February 2026


सातारा : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसौंदर्याने नटलेली पाचगणीनगरी सध्या एका अनोख्या साहसाची साक्ष देत आहे. येथील आकाशात सध्या रंगीबेरंगी पॅराग्लायडरचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यासाठी जगभरातील अडीचशे स्पर्धक पाचगणीत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रात प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. या जागतिक स्पर्धेमुळे पाचगणीच्या साहसी पर्यटनाला आता जागतिक स्तरावर नवे पंख मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय, हाय फ्लाय पॅराग्लायडिंग पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्पर्धेत जगातील २५ देशांतून सुमारे २५० नामांकित स्पर्धक सहभागी झाले आहेत.

१५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेसारख्या देशांतील सराईत वैमानिक (पायलट) पाचगणीत दाखल झाले आहेत. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळत असून, हॉटेल व्यवसायापासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

‘मेढा ते वाई’ असा थरार

स्पर्धकांना दररोज हवामान पाहून एक आव्हानात्मक ‘टास्क’ दिला जातो. पाचगणीच्या सिडनेपॉइंटजवळील तळमाळ येथून टेक-ऑफ केल्यानंतर स्पर्धकांना आकाशातून मेढा, वाठार, वाई येथे सुरक्षित उतरावे (लॅडिंग) लागते. जो स्पर्धक हवेचा वेग आणि दिशा यांचा अचूक अंदाज घेत, कमीत कमी वेळेत हे अंतर पार करून सर्वाधिक गुण मिळवेल, तो या जागतिक स्पर्धेचा मानकरी ठरेल.

सिडने पॉइंटवरील तळमाळ येथे हे उड्डाण पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक मोठी गर्दी करत आहेत. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पॅराग्लायडरमुळे पाचगणीचे आकाश उजळून निघाले असून, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. पाचगणीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धा होत असल्याने, शहर आणि परिसरातील हॉटेल, लॉज आणि स्थानिक बाजारपेठेत तेजी आली आहे. या स्पर्धेमुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर ‘ॲडव्हेंचर टुरिझम’मध्ये पाचगणीचा ब्रँड जगभर पोहोचण्यास मदत होत आहे.

पाचगणी हे पॅराग्लायडिंग स्पर्धेसाठी योग्य ठिकाण आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या सहकार्याने युरोपमध्ये भरवली जाणारी ही वर्ल्ड कप स्पर्धा या वर्षी भारतात सुरू आहे. पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. -अनुपम जाधव-पाटील, आयोजक


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात झाडांची केली लागवड ; १०५ गावांच्या प्रतिनिधींना भेटून मुंबईला रवाना
पुढील बातमी
कुडाळ-मेढा मार्गावर ठेकेदाराच्या पाण्याच्या टँकर वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

संबंधित बातम्या