सातारा : सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या लोकशाहीच्या अवहेलनाविरोधात आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर साताऱ्यात महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. ''लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांचा निषेध असो'' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात जिल्ह्यातील विविध महिला संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीवेळी घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
आंदोलकांनी शासन आणि प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेत झालेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळातील तक्रारींची सखोल तपासणी करावी, अशोक खरात प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करून सहआरोपी करण्याची मागणी, घरगुती गॅस सिलिंडरचे नियमित व वेळेवर वितरण, सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा घालावा, घरपोच देताना सिलिंडरचे वजन ग्राहकांसमोर तपासावे
प्रारंभी या आंदोलनात शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. ॲड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात सुषमा राजेघोरपडे, मनिषा साळुंखे, मालन परळकर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.