कराड : राज्याच्या वीज उद्योगातील कायम कर्मचारी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संप आहेत. त्यासंदर्भात येथील वीज कर्मचाऱ्यांनी आज येथे निवेदन दिले. उद्यापासून (गुरुवार) सलग तीन दिवस वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. त्यात जिल्ह्यातील बहुतांशी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
त्या आंदोलनाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीने पाठिंबा दिला आहे. वीज कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गाने होणाऱ्या खासगीकरणाला विरोध यासह विविध मागण्या आहेत. त्यात महानिर्मितीच्या ताब्यातील जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण, महापारेषणमधील टीबीसीबीच्या माध्यमातून होणाऱ्या खासगीकरण, महावितरणच्या ३२९ उपकेंद्राचे खासगीकरण, समांतर वीज परवाना आदींना विरोध आहे.
अन्य मागण्यांमध्ये महावितरण कंपनीमध्ये एकतर्फी पुनर्रचना केली जात आहे, त्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करावी, मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, तिन्ही कंपनीतील वर्ग तीन व चारची संवर्गनिहाय रिक्त पदे सरळसेवा भरती भरावीत, पदोन्नती व अंतर्गत भरतीद्वारे मूळ भरावीत, कंत्राटीसह बाह्यस्रोत कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याबाबत धोरण राबवावे, आदी मागण्यांसाठी विरोध करत कायम कर्मचारी संपावर गेले आहेत.
राज्यात ४२ हजार वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित आहेत. त्या समस्यांचे पत्र ऊर्जामंत्र्यांसह प्रशासनास देऊनही अद्याप संघटनेला चर्चेला बोलावले नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारीही पाठिंबा देत आहेत. उद्यापासून (गुरुवार) कंत्राटी कर्मचारीही काळी फीत लावून काम करणार आहेत. शुक्रवारी (ता. १०) दुपारी दीड वाजता प्रत्येक कार्यालयाबाहेर द्वार सभा घेणार आहेत. कामबंद आंदोलन सुरू करतील, अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिली.