सातारा : " कोणतीही श्रेष्ठ कलाकृती एका रात्रीत जन्म घेत नसते. श्रेष्ठ कलाकृतीच्या निर्मितीच्या पाठीमागे अनेक वर्षांची तपश्चर्या, अभ्यास, चिंतन, मनन, निरीक्षण व परिश्रम असतात. आपल्या सभोवतालची सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या जीवनातील संघर्ष, दुःख, समस्या, राजकीय, धार्मिक, जातीय ताणतणाव यांचा शोध घेऊन साहित्यिक कलाकृती निर्माण करत असतो. केवळ एक चांगला साहित्यिक घडविणे हे साहित्याचे प्रयोजन नसते. तर एक चांगला माणूस घडविणे हे साहित्याचे सर्वात श्रेष्ठ प्रयोजन असते." असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार निलेश महिगावकर यांनी केले आहे.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा अंतर्गत भाषा मंडळ व मराठी विभाग यांनी बी. ए. भाग - ३ या वर्गाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश असणारी निलेश महिगावकर लिखित कादंबरी 'बाभळी कॉलिंग ' या कादंबरीवर अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने साहित्य चर्चा कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियांका कुंभार यांनी करून दिला. साहित्यचर्चा कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध संवाद लेखक विशाल कदम, प्रा. निरंजन फरांदे यांनी सहभाग घेऊन बाभळी कॉलिंग कादंबरीवर समीक्षात्मक मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश महिगावकर म्हणाले की, " बाभळी कॉलिंग कादंबरीमधून मी माझा गाव, गावातील माणसं, त्यांचे दुःखं, जीवन संघर्ष, व्यथा, सामाजिक विषमता, भ्रष्टाचाराने किडलेली समाज व्यवस्था, माणसांच्या नात्यातील तुटलेले माणूसपण, माणसांमध्ये टिकून असलेली माणुसकी इत्यादी सामाजिक प्रश्न व मानवी मूल्यांचा शोध बोध मांडण्याचा वास्तविक प्रयत्न केला आहे." असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले की, "सातारा जिल्ह्यातील साहित्यिकाची कादंबरी अभ्यासक्रमामध्ये घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना सृजनशील लेखन करण्यास प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या सभोवतालच्या उपेक्षित, वंचित समाजाचे दुःख, त्यांचा जीवन संघर्ष प्रत्यक्ष साहित्य कलाकृतीमध्ये कसा आविष्कृत होतो. याचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होईल. म्हणून विद्यार्थ्यांनी बाभळी कॉलिंगसारख्या कादंबरीचा अभ्यास करून आपल्या सभोवताली च्या संघर्षशील समाजाचे वास्तव चित्रण कथा, कविता व कादंबऱ्यामधून करावे." असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
साहित्यचर्चा कार्यक्रमासाठी इर्जिक प्रकाशनचे प्रकाशक हरीश भोसले, तानाजी मालुसरे, पत्रकार स्वप्नील शिंदे, कवी शशिकांत बडेकर उपस्थित होते. पियुषा भोसले, तनुजा चव्हाण, ऐश्वर्या भोसले, माधवी जगदाळे या विद्यार्थिनींनी चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशाली शिंदे हिने केले तर आभार डॉ. संजयकुमार सरगडे यांनी व्यक्त केले. समन्वयक प्रा. प्रियांका कुंभार यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले.