आर. के. ट्रेडिंग कॅपिटल्सचा संचालक रोहित काठाळे साताऱ्यातून गायब ; आर. के.वर शाहूपुरी पोलिसांचा पुन्हा छापा; लॅपटॉप आणि नावाचा फलक गायब झाल्याने संशय वाढला

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा  : आर.  के. ट्रेडिंग कॅपिटल्स प्रकरणांमध्ये फसवल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी खाजगीमध्ये वाढू लागल्या आहेत. तीन तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली असून त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या राजवाडा येथील कार्यालयावर छापा मारला त्यावेळी तेथील महत्त्वाची कागदपत्रे लॅपटॉप गायब झाल्याची लक्षात आले आहे.

आर. के. ट्रेडर्स कॅपिटलचा संचालक रोहित काठाळे हा साताऱ्यातून गायब झाला असून त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ येत आहे. सोळा लाखाची फसवणूक केल्याबद्दल काठाळे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी सलग दोन दिवस राजवाडा येथील ट्रेडिंग कॅपिटल्सच्या कार्यालयावर छापा मारला आणि तेथील सर्व वस्तूंचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या दिवशी पद्धतशीरपणे कार्यालयाचा फलक तसेच कार्यालयातील कागदपत्रे इतर साहित्य गायब झाल्याने याबाबतचा संशय वाढला आहे. काठाळे याचे कुटुंबीय हे पंधरा दिवसासाठी कोल्हापूरला गेल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. काठाळे याची चार चाकी वाहन सुद्धा साताऱ्यातून गायब असल्याने त्याने साताऱ्या बाहेर पलायन केल्याच्या चर्चा आहेत.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार काठाळे हा नेहमीच हाय प्रोफाईल व्यक्तींची नावे घेत असत. एकदम व्यावसायिक पद्धतीने बोलणे आणि समोरच्यावर छाप पाडेल अशा पद्धतीने गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणे अशी त्याच्या कामाची पद्धत होती. मी तुमचा एक रुपया सुद्धा बुडू देणार नाही असे तो खात्रीपूर्वक सांगत असल्याची तक्रारदारांची माहिती आहे. कारवाई होण्यापूर्वीच कार्यालयातील साहित्याचे वाहनासह गायब होणे तसेच काठाळे याचे कुटुंबीय कोल्हापूरला जाणे या सर्व बाबी संशयास्पद असल्याच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी असून पोलिसांनी याचा मुळातून तपास करून त्याला ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजमाध्यमांद्वारे साहित्य संमेलनाचा डंका ‘अटकेपार’- तब्बल साडेसात कोटी साहित्य रसिकांनी समाजमाध्यमांद्वारे अनुभवला मायमराठीचा जागर
पुढील बातमी
साहित्य संमेलनाच्या 'अटकेपार' डिजिटल स्मरणिकेचा आज गुरुवारी वितरण शुभारंभ

संबंधित बातम्या