संत गाडगेबाबा 'स्वच्छतेचे विठ्ठल' आपण वारकरी होऊ: यशेंद्र क्षीरसागर, हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांना अभिवादन

by Team Satara Today | published on : 21 December 2025


सातारा : "महान समाजसुधारक संत गाडगेबाबा हे मानवतेचे आणि स्वच्छतेचे साक्षात विठ्ठल होते .आपण त्यांच्यापासून या सदगुणांचा वसा घेऊ आणि स्वच्छतेचे मानवतेचे वारकरी होऊ या," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर तसेच; सर्व शिक्षकगण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. क्षीरसागर म्हणाले, " संत गाडगेबाबा यांनी अज्ञान, अंधश्रद्धा याविरुद्ध आपल्या कीर्तनामधून प्रभावी प्रबोधन केले.  शिक्षण आणि मानवता यांचा वसा घेतला .गोरगरीब जनतेसाठी स्वच्छतेचा आणि माणुसकीचा संदेश दिला. गरीब आणि गरजू व्यक्तींमध्येच ईश्वर पहा. केवळ मंदिरात ईश्वर नाही, असे सांगून गाडगेबाबांनी 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' अशी मोलाची शिकवण दिली. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा मोठा स्नेह होता. स्वतःला मिळालेली जमीन त्यांनी धर्मशाळा, वसतिगृहे यासाठी दान केली. गावोगाव फिरून नि:स्वार्थीपणे स्वच्छतेचा आणि दीनदुबळ्यांच्या, प्राणीमात्राच्या सेवेचा संदेश दिला. हा संदेश केवळ बोलका नव्हता; तर ते कर्ते समाजसुधारक होते. भुकेलेल्या व्यक्तींना अन्न, तहानलेल्या व्यक्तींना पाणी, गरजू व्यक्तींना वस्त्र ,बेकारांना काम, खचलेल्यांना उमेद देणे अशा अनेक सदगुणांचा त्यांनी आपल्या कीर्तनातून जागर केला. हुंडा, अंधश्रद्धा यावर हल्ला केला. संत तुकारामांच्या अनेक अभंगांचा त्यांनी प्रभावी वापर करून जनप्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी माफ करणे ,अभिनंदन करणे, धन्यवाद देणे तसेच; आपल्या क्षमतेनुसार दान करणे अशा सद्गुणांचा अवलंब करावा. वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक स्वच्छता पाळावी." यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्याविषयी लिहिलेले लेख शाळेला भेट दिले. 

आगामी कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांविषयी स्वतःच्या 'संस्कृती कला मंचतर्फे' वक्तृत्व स्पर्धा जाहीर केली. मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्मार्ट मीटर जोडणीसाठी साताऱ्यात वीज ग्राहकांवर खाजगी कर्मचाऱ्यांकडून दबावतंत्र; वीज ग्राहकांकडून नाराजीचा सूर.

संबंधित बातम्या