सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटीनजिक आगीचा कहर; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटी परिसरात बुधवारी (दि. ८) दुपारी अचानक लागलेल्या आगीने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले. सांडपाण्याशेजारील वाळलेल्या गवताला लागलेल्या या आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले होते. मात्र, पालिकेच्या अग्निशामक दलाच्या वेळेवर पोहोचलेल्या पथकामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुखनगर सिटी येथे सुमारे ९५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुपारच्या तीव्र उन्हात अज्ञात व्यक्तीने सांडपाण्यालगत असलेल्या वाळलेल्या लव्हाळा गवताला अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग वेगाने पसरत गेली आणि परिसरातील लहान-मोठी झाडे तिच्या विळख्यात सापडली. 

काही क्षणांतच आग इतकी वाढली की, ती पाहून नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकावा अशी परिस्थिती निर्माण झाली. आगीची तीव्रता लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. विशेष म्हणजे, अवघ्या ५ ते ७ मिनिटांतच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून भीषण दुर्घटना होण्यापासून रोखली गेली.

स्थानिक नागरिकांच्या मते,अग्निशामक दल वेळेवर पोहोचले नसते, तर ही आग मयुरेश्वर कॉलनीपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसेच, परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांनाही मोठे नुकसान होऊ शकले असते. त्यामुळे सातारा पालिका अग्निशामक दलाच्या कामगिरीचे देशमुखसिटीचे चेअरमन सचिन मस्कर, सचिव दिपाली कदम, खजिनदार सतिश पाटील, सभासद योगेश भोसले यांच्यासह सर्व सभासद नागरिकांनी कौतुक केले. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आग नियंत्रणात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी देशमुख सिटीचे विकासक राजेश देशमुख हे उपस्थित राहिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

अवैध धंद्यास लगाम घालण्याची मागणी

सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटी व त्या परिसरात इमारतींची संख्या वाढू लागली आहे. याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेत या परिसरात पत्ते, जुगार, तळीरामांचा अड्डाच बनवला आहे. त्याचा स्थानिक रहिवांशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याबाबत शाहुपूरी पोलीसांनी अचानकपणे येवून अवैध धंद्यास लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप सातारा जिल्ह्याच्या तीन मोर्चांच्या नियुक्ती जाहीर; तेजस्विनी संग्राम घोरपडे, अमित भिसे, वासिम मुल्ला यांचा समावेश
पुढील बातमी
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांविरोधात थेट आंदोलन छेडण्याचा इशारा

संबंधित बातम्या