हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ

by Team Satara Today | published on : 07 June 2025


सातारा : २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अद्याप जुन्या वाहनांना नंबरप्लेट बसवण्याचं काम संथगतीने सुरू असल्याने ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२५ पर्यंत हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ दिली आहे. आत्तापर्यंत ६२ हजार वाहनांनी ही नंबरप्लेट आपल्या वाहनांना बसवून घेतली आहे.

सर्व वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक केले आहे. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हायसिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. परंतु २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही ही नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

अशी असते नंबरप्लेट..

ॲल्युमिनियमपासून बनलेली नंबरप्लेटची जाडी १ मिलिमीटरपेक्षा थोडी अधिक असते. त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक तसेच होलोग्राम खाली लेझर बॅण्डेड १० अंकी पिन कोड असतो.

२०१९ची लाखो वाहने रस्त्यावर..

जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर त्या वाहनावर कारवाई केली जाणार आहे; परंतु २०१९ पूर्वीची लाखो वाहने रस्त्यावर धावत असून, यासाठी पुरेशी मुदत देऊन तोपर्यंत दंडात्मक कारवाई स्थगित करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

किंमत किती आहे..

दुचाकीसाठी एचएसआरपी नंबरप्लेटची किंमत ४०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी १ हजार १०० रुपये आहे. याशिवाय जर कोणी जास्त पैसे आकारत असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनासाठी अतिरिक्त संरक्षण

हायसिक्युरिटी नंबरप्लेट किंवा एचएसआरपी नंबरप्लेट ही सुरक्षिततेचे जाळे म्हणून काम करते आणि तुमच्या वाहनासाठी अतिरिक्त संरक्षण सुनिश्चित करते. याला हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असेही म्हणतात आणि बनावटगिरी, छेडछाड आणि वाहनाशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मौजे कुंभरोशी येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" संपन्न
पुढील बातमी
शस्त्राचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले

संबंधित बातम्या