सातारा : कोरेगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी केलेल्या कारवाईत मोठे लाच प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे अद्याप फरार आहे. तर त्याच्यावतीने लाच स्वीकारणारा खाजगी इसम अवधूत दिलीप कालेकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव येथील भारत गॅस वितरकाकडून कारवाई न करण्यासाठी आणि तपासणी टाळण्यासाठी आनंद शिंदे यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सव्वा लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
दरम्यान, तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कोरेगाव येथील जनसेवा सहकारी बँकेच्या शाखा कार्यालयाच्या आवारात अवधूत कालेकर याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच आनंद शिंदे फरार झाले. कारवाईनंतर सोमवारी शिंदे व कालेकर यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी अवधूत कालेकर याला सातारा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.