सातारा : युरोपियन सायंटिफिक नेटवर्क ऑन करिअर गार्डन्स आणि नायजेरियन नेटवर्क ऑफ करिअर रिसर्चरस अँड प्रॅक्टिशनर्स या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साताऱ्यातील प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांचे नुकतेच मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आले होते. डॉ. ताटपुजे यांनी भारतामध्ये करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाने गेल्या पाच दशकांत केलेल्या प्रवासावर सखोल माहिती देणारे आंतरक्रियात्मक सादरीकरण केले. या सत्रात नायजेरिया आणि युरोपीय देशांतील १४ विद्यापीठांमधील सुमारे २५ करिअर समुपदेशन तज्ञांनी सक्रिय सहभाग घेतला.
या पहिल्या टप्प्यातील सादरीकरणामध्ये करिअर मार्गदर्शन क्षेत्रात साताऱ्यामध्ये केलेले अनेक इनोव्हेटिव्ह प्रकल्प यावेळी मांडण्यात आले. नायजेरियन तज्ञांनी करिअर ॲप्टीट्यूड टेस्ट आणि ऑनलाइन कौन्सिलिंग संदर्भात केलेल्या या प्रकल्पांची प्रशंसा करून सदर प्रकल्प नायजेरियामध्ये राबवण्यासाठी समन्वय सहकार्य करून डॉ. ताटपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्याचे ठरवण्यात आले. या व्याख्याना द्वारे भारतीय करिअर मार्गदर्शनाचा इतिहास हा नव्यानेच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर येतो आहे.
सातारच्या विद्यादीप फाउंडेशनने यानिमित्ताने भारतातील गेल्या पन्नास वर्षातील करिअर मार्गदर्शन क्षेत्राच्या इतिहासाच्या मांडणीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे अशी माहिती विद्यादीप फाउंडेशनने अध्यक्ष दामोदर मेढेकर आणि सचिव डॉ. विद्या ताटपुजे आणि सतीश शेंडे यांनी दिली.
भारतातील व्यावसायिक शिक्षणाचा इतिहास १९५२-५३ मध्ये मुदलियार आयोगाने बहुउद्देशीय शाळांची शिफारस करण्यापासून सुरू होतो. त्यानंतर, कोठारी आयोगाने (१९६४–६६) १०+२+३ ही शिक्षण प्रणाली लागू करण्याची आणि १०+२ स्तरावर व्यावसायिक शिक्षणाचे ५०% पर्यंत लक्ष्य ठेवण्याची शिफारस केली. १९७५ मध्ये १०+२ शिक्षण पद्धत सुरू झाली आणि १९७६-७७ मध्ये निवडक राज्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला (१९७५–१९८५), व्यावसायिक शिक्षण अत्यंत कमी होते, माध्यमिक स्तरावरील १% पेक्षा कमी विद्यार्थी व्यावसायिक प्रवाहात होते.
१९८६ च्या पहिल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकरणावर भर दिला. १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली. व्यावसायिक मार्गांना तुच्छ लेखले जाणे आणि अभ्यासक्रम उद्योगाच्या गरजा पूर्ण न करणे ही प्रमुख आव्हाने होती. २००८ मध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर आधारित नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ची स्थापना झाली. यानंतर, २०१४ मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय तयार करण्यात आले आणि ‘स्किल इंडिया मिशन’ सुरू झाले. या काळात करिअर मार्गदर्शनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढू लागला.
२०२० च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने (एन ई पी ) शिक्षणात मोठे बदल घडवून आणले. या धोरणाने व्यावसायिक शिक्षण सहावी इयत्तेपासूनच मुख्य प्रवाहात आणले आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रवाहातील फरक दूर केला. एनईपी २०२० चे मुख्य लक्ष्य आहे की २०२५ पर्यंत किमान ५०% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव मिळावा. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत साधनांचा वापर करून वैयक्तिकृत करिअर मार्गदर्शन उपलब्ध केले जात आहे.
एनईपी २०२० अंतर्गत नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क विकसित केले जात आहे, ज्यामुळे कौशल्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अखंड गतिशीलता शक्य होईल. भविष्यात आयुष्यभर शिक्षण आणि उद्योगांशी सहकार्य वाढवून भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, कुशल मनुष्यबळ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रा. डॉ. ताटपुजे यांनी भारतातील या ५० वर्षांच्या प्रवासातून भविष्यातील कौशल्य विकासाचा मार्ग कसा अधिक सशक्त करता येईल, यावर प्रकाश टाकला.