सातारा : थंडीच्या कडाक्यासोबतच सातारकरांना आता वेध लागले आहेत ते नूतन वर्षाचे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यासाठी सातारा शहर सज्ज झाले आहे. इंग्रजी नवीन वर्षाच्या आगमनाला अवघे १० दिवस उरले असतानाच शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नववर्षाची पहिली तयारी म्हणजे घरात नवीन कॅलेंडर आणणे. डिजिटल युगात मोबाईलमध्ये तारखा दिसत असल्या तरी, आजही सातारकरांच्या घरात भिंतीवर लटकणाऱ्या दिनदर्शिकेला (कॅलेंडर) विशेष मान आहे. याच पार्श्वभूमीवर सातारचे मध्यवर्ती ठिकाण आणि साहित्याचे माहेरघर असलेल्या मोती चौकातील विविध पुस्तकालयांमध्ये नामवंत कंपन्यांच्या दिनदर्शिका मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
महालक्ष्मी, कालनिर्णय यांसारख्या प्रसिद्ध पंचांगांपासून ते विविध स्थानिक आणि राज्यस्तरीय प्रकाशन संस्थांच्या आकर्षक कॅलेंडर्सनी दुकाने सजली आहेत. सण-वार, शुभ मुहूर्त आणि सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी नागरिक आवर्जून पंचांग खरेदी करताना दिसत आहेत. मोती चौकातील पुस्तक विक्रेत्यांकडे सध्या ही खरेदी करण्यासाठी सातारकरांची अक्षरशः झुंबड उडाली आहे.
येत्या काही दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून, केवळ दिनदर्शिकाच नव्हे तर डायरी आणि वह्या खरेदीसाठीही नागरिकांचा ओघ वाढला आहे. एकंदरीतच, २०२६ च्या स्वागताची तयारी सातारकरांनी जोरात सुरू केल्याचे चित्र शहरात दिसत आहे.