सातारा : "केवळ शैक्षणिक गुणवत्ता मिळविणारा नव्हे; तर संवेदनशील असलेला विद्यार्थी ही खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. भौतिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून उन्नती साधावी", असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील ज्ञानश्री इंजीनियरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी पालक मिळावा मोठ्या उत्साहात झाला. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य जयवंत जगताप, शिक्षक, साताऱ्यातील व्यावसायिक विलास जावळे तसेच; विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी सर्व अर्थाने आपली प्रगती साधावी. पालकांनी त्यांना वेळ द्यावा.त्यांच्याशी संवाद साधावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, बाबा आमटे अशा महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवावा. उत्कृष्ट गुण मिळवावेत. त्याबरोबरच संत, समाजसेवक, समाजसुधारक तसेच आत्ताच्या काळातील समाजसेवक यांचा अभ्यास करावा. त्यांच्या कार्याचे वाचन करावे. "माफी, अभिनंदन आणि धन्यवाद" या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. त्यामुळे स्वभावात नम्रता येते. त्यागभावना वृद्धिंगत होते."द्या म्हणजे मिळेल" हा मंत्र ध्यानी ठेवावा. म्हणजेच दानाचे महत्त्व समजेल. संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महान थोर व्यक्तींनी त्याग केला .
समाजाची सेवा मनोभावे केली .वयाच्या केवळ 23 व्या वर्षी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देशासाठी फाशी गेले. आपल्याला स्वातंत्र्य मोफत मिळालेले नाही. या बलिदानातून मिळालेले आहे. याचे भान ठेवून आणि लाखो विद्यार्थ्यांमधून आपल्याला चांगली शैक्षणिक संधी आहे हे ओळखून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. "अवघाची संसार सुखाचा करीन" अशी प्रतिज्ञा संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी केली. तसेच अभ्यासाचे महत्त्व संत तुकाराम यांनी आपल्या अभंगांमधून प्रकर्षाने सांगितले. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा आणि आपल्या पालकांसह कॉलेज आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे. शोषित ,वंचित, पीडित यांची सेवा करणे हे सर्वोच्च ध्येय मानावे. स्वतः यशस्वी व्हावे आणि समाजाची देखील सेवा करावी. त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे."कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन जनसंपर्क अधिकारी अमृता चिखलगे यांनी केले प्रा.विजय चव्हाण यांनी प्रस्तावना केली. उपप्राचार्य जयवंत जगताप यांनी आभार मानले.