सातारा : भाषा जितकी जुनी तितकी ती अभिजात असते. भाषेचा विकास तिच्या सातत्यपूर्ण लेखन, भावसमृध्दता आणि समकालिकतेच्या व्याप्तीवर ठरतो. भाषा बोलली गेली नाही, तर ती नष्ट होते. मराठी भाषा जोपर्यंत रोजगाराची भाषा होत नाही, तोपर्यंत तिचे अस्तित्व धोक्यात राहील, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने मसाप, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने साता-यात अभिजात दर्जा सप्ताह साजरा करण्यात आला. त्याचा समारोप आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये झाला. यावेळी ते बोली भाषा ते अभिजात भाषा या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी शिरीष चिटणीस तर प्रमुख उपस्थिती प्राचार्या व्ही.एस.नलवडे तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. आर. मोरे सर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका अर्चना पोरे, बी.एड. भाग दोनच्या छात्राध्यापिका संपदा खटावकर यांनी उत्तमरीत्या पार पाडले. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वि.ना.लांडगे, श्रीराम नानल ,तुषार महामुलकर, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, शैलेश ढवळीकर, बीएड भाग एक व दोन मधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे वैभव, तिचे अभिजात स्वरूप आणि आधुनिक काळातील आव्हाने यांची सखोल जाण प्राप्त झाली.