पोषण माह उपक्रमात साताऱ्याचा सन्मान

रोहिणी ढवळे यांना पुरस्कार; दहा जिल्ह्यांची उल्लेखनीय कामगिरी

by Team Satara Today | published on : 15 October 2024


सातारा : राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधीक्षक कैलास पगारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रोहिणी ढवळे यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या वतीनेही पुरस्कार स्विकारले. 

नाशिक, रायगड, सातारा, अमरावती, नांदेड, हिंगोली, भंडारा, बीड, नंदुरबार, परभणी या जिल्ह्यांनी राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात २०२२, २०२३ व २०२४ या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबाबत संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. २०१८ पासून सप्टेंबर महिना हा दरवर्षी पोषण माह म्हणून साजरा केला जातो. याद्वारे जनजागृती मोहीम राबवून बालकांच्या पोषणासाठी प्रयत्न केले जातात. या वर्षी सर्व जिल्ह्यांच्या एकत्रित प्रयत्नातून राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री तटकरे यांनी केले. तसेच त्यांनी कुपोषणाच्या समूळ उच्चाटन कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.

साताऱ्याचा गुणगौरव : मंत्री अदिती तटकरे यांनी सातारा जिल्ह्याचा वारंवार उल्लेख केला. सातारा जिल्ह्यामध्ये मिशन धाराऊ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला गेला. असे नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व जिल्ह्यांनी राबवले पाहिजेत. या उपक्रमाचे नियोजन उत्कृष्ट असून, त्यातून अपेक्षित फलनिष्पत्ती दिसून आली आहे. हा उपक्रम पूर्ण राज्यस्तरावर राबवला गेला पाहिजे, असे गौरवोद्गार मंत्री तटकरे यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतिमंद मुलांनी बनविलेल्या रोटरी दिवाळी कीटचे उदघाटन
पुढील बातमी
'सुंदर शाळा'त साताऱ्याच्या दोन शाळांचा गौरव

संबंधित बातम्या