सातार्‍यात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा भव्य मोर्चा

by Team Satara Today | published on : 16 September 2025


सातारा : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दि. 8 सप्टेंबरपासून गेले आठ दिवस जिल्हाधिकारी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हा परिषद कार्यालय, असा भव्य मोर्चा काढून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दरम्यान, याप्रश्नी तोडगा न निघाल्यास नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा एल्गार पुकारला आहे.

दरम्यान, मागण्याबाबत ग्रामविकासमंत्र्याबरोबर बैठक होणार असून बैठकीत तोडगा न निघाल्यास दसरा, दिवळीनंतर नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे राज्य सचिव कॉ. शामराव चिंचणे यांनी दिली.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या किमान वेतन अनुदान दरमहा वेळेवर कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करावे. किमान वेतन सल्लागार समितीने तातडीने सुधारीत किमान वेतन दर जाहीर करावे. अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतन श्रेणी लागू करावी. दिपक म्हैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन लागू करावी. ग्रामपंचायतीचे उत्पन्न, वसुली अशा जाचक अटी रद्द करुन किमान वेतनावर 100 टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांबाबत दि. 8 सप्टेंबरपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

गेली 8 दिवस आंदोलन सुरू होते. सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, असा भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर द्वारसभा झाली. यावेळी शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना भेटले.

यावेळी शिष्टमंडळास राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी मंत्रालय मुंबई येथे लवकरच बैठक लावून मागण्यांबाबत योग्य तोडगा काढू, असे पत्र याशनी नागराजन यांनी दिले आहे. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र मागण्यांबाबत शासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्यास दसरा दिवाळीनंतर पुन्हा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे शामराव चिंचणे यांनी सांगितले.

दरम्यान, झेडपीसमोर झालेल्या द्वारसभेत राज्यातील आलेल्या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे झेडपी परिसर दणाणून गेला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनाकडील नळजोडणी धारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या