खंडाळा : डिझेल आभावी एस.टी. बसच्या फेऱ्या रद्द होत असून लांब पल्ल्याच्या बसेस इतर आगाराचा आधार घेत आहे. त्यामुळे पारगाव-खंडाळा आगाराची लालपरी डिझेलसाठी दुसऱ्याच्या दारी जात असल्याचे चित्र आहे. आगारातील गलथान कारभाराचा फटका थेट प्रवाशांना बसू लागल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे-सातारा मार्गावर मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पारगाव खंडाळा आगार होय. आगार असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे येथील बसेसला अनेकदा डिझेल भरण्यासाठी नजीकच्या अन्य आगारांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बसच्या नियोजित फेऱ्या रद्द होण्याची शक्यता असते. यामुळे ग्रामीण भागाबरोबर आणि शहराकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने खासगी वाहने अथवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागतो. ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
डिझेल पंपाची स्टॅम्पिंगची मुदत सप्टेंबर 2025 मध्ये संपली आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात बसेससाठी डिझेलचा साठा नियमित उपलब्ध असणे बंधनकारक असते. मात्र, पारगाव-खंडाळा आगारात डिझेल व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर गलथानपणा असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, लालपरीचे डिझेल अभावी वेळापत्रक कोलमडल्यास फेऱ्या रद्द होणे, चालक वाहक यांच्याकडून उत्पन्न कमी आल्यावर अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना तंबी दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. डिझेलचा अभाव, बसेस वेळेत न मिळणे. याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे.
महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. पारगाव-खंडाळा आगारातील डिझेलचा पुरवठा नियमित करावा. डिझेल व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात आणि या गलथान कारभारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.