आलिया भट्ट  स्टारर जिगरा 11 ऑक्टोबर 2024 रोजी होणार रिलीज 

अंगावर काटा आणणारा अभिनेत्रीचा 'जिगरा'

by Team Satara Today | published on : 26 September 2024


अभिनेत्री आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जिगरा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वसन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियाने सत्याची भूमिका साकारली आहे. एका दक्षिणपूर्व आशियाई देशात अटक झाल्यानंतर भावाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या बहिणीची (सत्या) ही कथा आहे. या चित्रपटात आलिया आणि वेदांगसोबतच मनोज पाहवा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच ॲक्शनपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसणार आहे. भावाच्या सुटकेसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या बहिणीच्या जबरदस्त भूमिकेत आलियाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. पुन्हा एकदा तिच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय. यातील काही दृश्ये अंगावर अक्षरश: काटा आणतात.

या ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय की सत्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करत असते. तिच्या भावाला अटक झाल्यानंतर ती परदेशात जाते. भावाची सुटका करण्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी असते. सत्याच्या भावाला खोट्या आरोपाखाली अटक केल्याचं दिसून येतंय. यात मनोज पाहवा हे सत्याच्या गुरू/वडिलांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात ॲक्शन सीन्सचा भरणा असला तरी त्याला भावनिक कथेची जोड आहे. आलियाच्या भावाच्या भूमिकेतील वेदांगने याआधी ‘द आर्चीज’ या चित्रपटात काम केलं होतं. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात काही स्टारकिड्सने भूमिका साकारल्या होत्या.

‘जिगरा’ हा आलियाचा या वर्षातील पहिलाच चित्रपट असेल. गेल्या वर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. ‘जिगरा’शिवाय आलिया यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये शर्वरी वाघचीही भूमिका आहे. ‘जिगरा’ हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
या व्हिडिओंना लाईक केली तरी होणार चौकशी
पुढील बातमी
अभिनेत्री रेश्मा शिंदेने दाखवली नव्या ज्वेलरी शॉपची पहिली झलक!

संबंधित बातम्या