फलटण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
फलटण येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आ. सचिन पाटील, मनोज घोरपडे, अतुल भोसले, राहुल कुल, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त करण्यासाठी नीरा देवघर कालव्याच्या कामातील अडचणी दूर करून कामाला सुरुवात केली आणि प्रकल्पाचे पाणी फलटण आणि माळशिरसला देणे शक्य करून दाखविले आहे. माणदेशातील साहित्य दुष्काळावर आधारित होते, हा दुष्काळ दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हरित माणदेश तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरा देवघर, जिहे कटापूर, टेंभू उपसा योजनेचे वेगवेगळे टप्प्यातून दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले आहे. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित २२ गावांना पाणी देण्यात येईल. नीरा देवघर प्रकल्पातील तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी शासन इथल्या जनतेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व सुविधा फलटण शहरात आल्या आहेत. प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, न्यायालय आदींच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पाडेगाव, साखरवाडी-जिंती-फलटण-शिंगणापूर रस्ता करण्यात येईल. माणगंगा नदीचा समावेश अमृत २ मध्ये करण्यात येईल आणि फलटण येथे न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येईल. फलटण येथील विमानतळाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येऊन काम शक्य असल्यास करण्यात येईल. फलटण येथील रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामविकासमंत्री श्री.गोरे म्हणाले, फलटण परिसराच्या दुष्काळ मुक्तीसाठी शासनाने महत्वाचे निर्णय तसेच प्रकल्प हाती घेतले आहेत. माण, खटाव आणि फलटण परिसरातील दुष्काळ त्यामुळे दूर होणार आहे. नीरा देवधर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक योजना मार्गी लागत असून फलटणच्या विकासाचा मार्ग त्यामुळे खुला झाला आहे. उद्योग, वाहतूक आदी क्षेत्रातही विकासाला चालना मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रास्ताविकात विकासकामांची माहिती दिली. या विकासकामांमुळे येथील शेती आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल व परिसराचा सर्वांगीण विकास होईल. नीरा देवधर उजव्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीला फायदा होऊन शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी येईल.
कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यात पी. एम. जनमन योजनेंतर्गत घरकुल लाभ, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्र, फळबाग लागवड व सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान, उत्कृष्ट बचत गट, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांना सन्मानित करण्यात आले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कार्यरत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बील माफीसारखी योजना बंद होणार नाही. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना दिवसा वीज मोफत देण्यात येईल तसेच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर नेण्यात येतील, असेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले. आ. सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यात अनेक विकासकामे होत असल्याचे नमूद केले. माजी खासदार श्री. नाईक निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात तालुका व परिसरात झालेल्या व हाती घेण्यात आलेल्या विकासकामांविषयी माहिती दिली.
फलटणच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सभास्थळी नागरिकांसह शेतकरी, महिला आणि युवकांनी हजेरी लावली होती. “देवेंद्रजी पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण भारावून टाकले. जोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे कार्य थांबणार नाही. अभी तो नापी हे मुठ्ठी भर जमीन, अभी पुरा आसमान बाकी है, अशी पूर्ण ताकद देण्याचीग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायरीतून दिली.