नगर वाचनालयातर्फे वाचन कट्ट्याचे आयोजन, सामूहिक वाचनाचा अभिनव उपक्रम - नगर वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांची माहिती

by Team Satara Today | published on : 14 January 2026


सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) वाचनालयाच्या वतीने वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी ‘वाचन कट्टा’ हा सामूहिक वाचनाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शहरातील एका नियोजित ठिकाणी या कट्ट्याचे आयोजन होणार असून, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या रविवारी (ता. १८) या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिली. 

श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘नगरवाचनालय ही संस्था १७५ वे वर्ष साजरे करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, १७३ वर्षे वाचक नगरवाचनालयात येत आहे. आता त्याचबरोबर नगरवाचनालयही वाचकांपर्यंत जाईल असा हा उपक्रम या निमित्ताने राबविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचकांची संख्या वाढावी आणि सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनाची सवय अधिक वाढावी, यासाठी वाचन कट्टा’ या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत, तसेच हा वाचन कट्टा सर्वांसाठी मुक्तही असणार आहे.’’ 

या उपक्रमात दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सकाळी नऊ वाजता एका ठिकाणी सातारा शहराच्या विविध भागांतील ठिकाणाचे नाव त्या त्या महिन्यात ठरविले जाणार आहे. जमून एखादी विशिष्ट संस्था किंवा गटाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच काही विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करतील अशी ही संकल्पना आहे. उपक्रमात सहभागी होणारा प्रत्येक जण सोबत एक पुस्तक आणेल व ठरलेल्या वेळात त्या पुस्तकाचे वाचन करेल. नगरवाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत वाचन करण्यासाठी येणाऱ्या नियोजित संस्थेचे सदस्य, तसेच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. उपक्रमाचा शुभारंभ येत्या रविवारी (ता. १८) राजवाड्याजवळील प्रतापसिंह उद्यानात होणार आहे. त्यादिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी या वाचनाच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यादिवशी सकाळी साडेआठ वाजता हे सर्व जण राजवाड्याजवळील गोलबागेत एकत्रित येतील. तिथे छत्रपती प्रतापसिंह महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर प्रतापसिंह उद्यानात या उपक्रमाचा प्रारंभ होईल. अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्यात सदरबझार, शाहूनगर, शाहूपुरी अशा विविध विभागांतील एका ठिकाणी टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. 

मोबाईल बंद ठेवावा लागणार 

सामूहिक वाचनाच्या या उपक्रमाच्या वेळी वाचन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून सर्वांनीच काही संकेत पाळणे अपेक्षित असल्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मोबाईल पूर्णपणे बंद ठेवणे महत्त्वाचे आहे. या सामूहिक वाचनाच्या काळात मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून उपक्रमात सहभागी होणे आवश्‍यक आहे, तसेच वाचनाला सुरुवात झाल्यानंतर एकमेकांशी बोलणे किंवा इतरांचे लक्ष वेधण्यासाठी काही कृती करू नये, अशा काही अपेक्षा पूर्ण झाल्या तर उपक्रमाचा हेतू चांगल्या पद्धतीने साध्य होईल, असे यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निष्पक्षपातीपणे काम करुन निवडणुका सुरळीत पार पाडा- जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश; कोणत्याही परिस्थितीत पक्षपाती वर्तणुकीची तक्रार खपवून घेतली जाणार नाही
पुढील बातमी
महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; चार जखमी, मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी

संबंधित बातम्या