ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

by Team Satara Today | published on : 07 May 2025


साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटातील ‘श्याम’ची म्हणजे छोट्या साने गुरुजींची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचं आज बुधवार (दि. ७ मे) रोजी निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा, अभिनेता-दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे.

माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला. वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यगुरू आणि नाट्य समीक्षक अशी ओळख असलेल्या वझे यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदके मिळाली होती. भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन त्यांनी केलं होतं.

गोवा येथील कला अकादमीच्या नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलेले वझे आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद होते. तसंच, परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केलं होतं. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ मध्ये रंगमंचावर आलं होतं.

माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट

डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट)

थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट)

श्यामची आई (बालनट) माधव वझे यांची पुस्तके

प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन – माधव वझे)

रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे)

श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)

नंदनवन (मुलांसाठी)

समांतर रंगभूमी : पल्याड- अल्याड

पुरस्कार

रंगमुद्रा या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार

प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार

श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी या पुस्तकाला पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार

समांतर रंगभूमी : पल्याड- अल्याड या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे नगर वाचन मंदिराचा पुरस्कार


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पॅरा बुद्धिबळ स्पर्धेत साताऱ्याच्या संस्कृती मोरेंना सरकारकडून ३७ लाखांचे पारितोषिक
पुढील बातमी
लवकरच धावणार पुणे-नागपूर वंदे भारत ?

संबंधित बातम्या