सातारा : झेडपीच्या अंतर्गत अंतर्गत क आणि ड संवर्गात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसारच करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली. दरम्यान, झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत दिलेल्या कारणामध्ये प्राधान्याने घटस्फोटीतांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे.
झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रियाबाबत सर्व माहिती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेत सोयीची गावे मिळावीत म्हणून विविध आजारांची दिलेली कारणे आता यापुढे ती सर्व सेवा पुस्तकात करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे विशेषत: कायद्याच्यादृष्टीने घटस्फोट झालेल्यानंतर जे वारस असतील त्यांनाच त्यांच्या पश्चात लाभ मिळणार असल्याने घटस्फोटीतांचे सोंग घेतलेल्या शिक्षकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात संवर्ग क आणि ड मधील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया पार पाडली जाते. यावर्षीही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदली करण्यात आली. प्रशासकीय, आपसी आणि विनंती अशा या बदल्या झालेल्या आहेत. तरीही या बदल्यावरुन आरोप सुरू झालेले आहेत. समााजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तर २ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी पत्रकार परिषदेत बदली विषयी माहिती देण्यात आली.
अर्चना वाघमळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील आताची कर्मचारी बदली प्रक्रिया ही सामान्यीकरण तत्वानुसार आणि पारदर्शकपणे झाली आहे. या बदली प्रक्रियेचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. बदलीत अन्याय झाल्याबाबत एकही निवेदन तसेच तक्रार आतापर्यंत आलेली नाही. एखाद्याची बदली मनाप्रमाणे झाली नसेल तर चुकीचे प्रकार चर्चेस आणले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनाही या पारदर्शक बदलीबाबत माहिती देणार आहोत. त्यांना बदली बाबतची सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. कोणाची बदलीबाबत तक्रार असेल त्यांनी समितीकडे अर्ज किंवा तक्रार तत्काळ द्यावी, त्याचे निराकारणही करण्यात येईल.
झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक नव्याने येणार आहे. त्यामुळे त्याबाबतची सर्व अद्यायावत माहिती जिल्हा प्रशासनाकडे तयार आहे. दरम्यान, बदलीबाबत चुकीचे प्रमाणपत्र घेणाऱ्यांची तपासणी होणार आहे. झेडपीच्या आरोग्य विभागाकडून संबंधित तालुकास्तरावर होवूनच केली जाणार आहे. यामुळे बदलीप्रक्रियेत विविध आजारांचे नाटक वटवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली जाणार आहे.