पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत खोलवर चढायांच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्स संघाने गुजरात जाएंट्स संघाचा ४२-२९ असा सहज पराभव करून या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.
प्रो कबड्डीत दोन्ही संघांची सुमार कामगिरी
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात व जयपूर या दोन्ही संघांची आजपर्यंतची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरात संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले आहेत. याआधीच्या सामन्यात गुजरात संघाला तमिळ थलाईवाजकडून पराभव पत्करावा लागला होता.
जयपूर संघाने सुरुवातीपासूनच ठेवली आघाडी
जयपूर संघालादेखील फारशी चमकदार कामगिरी करता आली. त्यांनी आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. जयपूर संघाला याआधी पाटणा पायरेट्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच या दोन्ही कमकुवत संघांमध्ये आज कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.
सांघिक कौशल्याच्या जोरावर जयपूरचा मोठा विजय
सामन्यात सुरुवातीपासूनच सांघिक कौशल्याच्या जोरावर जयपूर संघाने आघाडी घेतली होती. आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदवीत १३-५ अशी आघाडी मिळविली. गुजरात संघाच्या खेळाडूंनी ही पिछाडी भरून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.मात्र, त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला जयपूर संघाकडे १७-८ अशी आघाडी होती. पंधराव्या मिनिटाला त्यांनी दहा गुणांची आघाडी मिळवली होती. जयपूर संघाच्या भक्कम बचावतंत्रापुढे गुजरात संघाच्या चढाईपटूंच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना जयपूर संघाने आणखी एक लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २६-१४ अशी मोठी आघाडी होती.
गुजरातला चारही बाजूंनी दिली जयपूरने मात
उत्तरार्धात जयपूरच्या बलाढ्य आक्रमणास गुजरातचे खेळाडू कसे सामोरे जातात हीच उत्सुकता होती. सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर संघ ३४-२१ अशा गुणांनी आघाडीवर होता. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाने ३८-२६ अशी आघाडी टिकवीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. जयपूर संघाच्या विजयात अर्जुन देशवाल, नीरज नरवाल यांनी केलेल्या खोलवर चढायांचा मोठा वाटा होता. गुजरात संघाकडून सुपररेड टाकणारा गुमान सिंग व राकेश यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू फारशी चमक दाखवू शकला नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
