सातारा : गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शिधा मिळणार काय ? असा सवाल गोरगरीब जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास शासनाच्या वितरण व्यवस्थेवरही मोठा ताण येणार असून, सण संपल्यानंतर लोकांच्या हाती शिधा पडणार आहे. त्यामुळेच वेळीच निर्णय करून गरिबांचा सण गोड करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने वर्षभरातील महत्त्वाच्या सण - उत्सवात लाभार्थींना शंभर रुपयात आनंदाच्या शिधाचे वितरण करण्यात येते. गेल्यावर्षी गौरी-गणपतीचा सण ७ सप्टेंबर २०२४ रोजी होता. त्यावेळी आनंदाचा शिधा देण्याचा शासननिर्णय जवळपास दोन महिने अगोदर दि. १२ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला होता. तरीही सणादिवशी अनेकांना शिधा मिळाला नाही. पितृ पंधरवडा संपल्यानंतरही वाटप सुरूच होते. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शिधासंच वाटपाला दोन महिनेही अपुरे पडले.
यंदा ४.२८ कार्डधारक आहेत. गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला असून, तीन आठवडे उरलेत. तरीही शिधाची अधिकृत घोषणा झालेली नाही. ऐनवेळी घोषणा केल्यास वाटपाचे नियोजन करून शिधा हाती पडायला उशिर होणार आहे. त्यामुळे गरिबांचा सण शासन गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित आहे.