मुख्यालयी राहून वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - याशनी नागराजन यांचा आरोग्य यंत्रणेला इशारा; मरळी, ठोसेघरचे वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त

by Team Satara Today | published on : 02 February 2026


सातारा  : वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा सुविधा पुरविणे, प्रा. आ. केंद्र, उपकेंद्रांचे ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे, आरोग्य सेवेपासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही याबाबत अनेक वेळा लेखी, तोंडी सूचना देऊन सुध्दा जिल्हयातील काही अधिकारी व कर्मचारी कार्यस्थळी वेळेत उपस्थित नसतात. मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होणेस अडचणी येत असलेबाबत तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे येत आहेत. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर नोंद घेतली आहे.

काही प्रा. आकेंद्रांचे ठिकाणी प्रसुती, श्वानदंश, सर्पदंश, अपघात, इ. वेळी तातडीची सेवा उपलब्ध होत नसलेबाबत तक्रारी प्राप्त आहेत. तसेच रात्रीच्या वेळी प्राआकेंद्रांचे ठिकाणी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने तातडीची आरोग्य सेवा मिळणेस अडचणी येत आहेत, अशा तक्रारी प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात रुग्ण सेवा वेळेवर न देणा-या जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र मरळी ,ता. पाटण व प्राथमिक आरोग्य केंद्र ठोसेघर, ता.सातारा येथील वैद्यकीय अधिकारी यांना असमाधानकारक कामकाजामुळे शासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. सदर ठिकाणी नजीकच्या वैद्यकीय अधिकारी यांना कामकाजाचे तात्पुरते आदेश देण्यात आले आहेत.

तथापी जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेस तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होणेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहून कार्यस्थळी वेळेवर उपस्थित राहणेबाबत सक्त सूचना देणेत आलेल्या आहेत. याअनुषंगाने राज्य, जिल्हा स्तरावरुन भरारी पथकाव्दारे तपासणी सुध्दा करणेत येत असून 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करण्यात येत आहे. 

याव्दारे जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना अंतिम सक्त सूचना देण्यात येते की, जिल्हातील एकही रुग्ण तातडीच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्राआकेंद्रांचे ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहावे, विनापरवानगी गैरहजर राहू नये, मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत यांचेवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करणेत येणार आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाणांना अभिवादन
पुढील बातमी
सात हजाराची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी जाळ्यात; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कराडमध्ये कारवाई

संबंधित बातम्या