कराड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा आगाशिवनगर मलकापूर (ता. कराड) येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. योगेश्वरी निटुरे (वय २२), असे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांसह देश-परदेशातील विद्यार्थी दरवर्षी येत असतात. अशाच एका वैद्यकीय महाविद्यालयात परजिल्ह्यांतील एक २२ वर्षीय युवती शिक्षण घेत होती. ती आगाशिवनगर मलकापूर येथील एका इमारतीत वास्तव्यास होती, अशी घटनास्थळी चर्चा होती. याच इमारतीवरून संबंधित युवती रविवारी सकाळी आठच्या सुमारास पडल्याने गंभीररीत्या जखमी झाली होती.
त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात असून, अधिकृत माहिती सोमवारी रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. त्यामुळे या घटनेबाबतचा संभ्रम रात्री उशिरापर्यंत कायम होता.
या दुर्दैवी घटनेनंतर परजिल्ह्यातील एका मोठ्या व्यक्तीची मुलगी असल्याची चर्चा सोमवारी सुरू होती. त्यामुळेच पोलिसांकडून सखोलपणे या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व शक्यता लक्षात घेत चौकशी केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अधिकृत माहिती समोर न आल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.