बारामती हादरली ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला कारखाली चिरडून मारले

गाणगापूर येथे दर्शनाला जाताना कर्नाटक राज्यातील घटना

by Team Satara Today | published on : 27 March 2026


बारामती/कलबुर्गी: चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीची अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली असून, या घटनेने बारामती शहर आणि परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नीमधील वादाने इतके भीषण रूप धारण केले की, पतीने भररस्त्यात पत्नीला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर कार घालून तिला जागीच ठार केले.

​मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील हे दाम्पत्य देवदर्शनासाठी कर्नाटकातील गाणगापूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान कलबुर्गी जिल्ह्यातील बल्लुरगी गावाजवळ त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात पतीने चालत्या कारमधून पत्नीला खाली ओढले आणि रस्त्यावरच तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा अमानुष प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. काही काळ मध्यस्थी करून नागरिकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी पती शांत असल्याचे भासवत होता. मात्र, नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला.

​मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला हतबल होऊन पडलेल्या पत्नीच्या अंगावर पतीने थेट कार चढवून तिला चिरडले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी होऊन २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केवळ रागाच्या भरात घडला नसून तो पूर्वनियोजित असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रसाद जोशी यांना यंदाचा " उषा-वैभव " पुरस्कार जाहीर; सुप्रसिद्ध गायिका श्रीमती उषा मंगेशकर यांच्या हस्ते दि. ५ एप्रिल रोजी वितरण

संबंधित बातम्या