कराडामध्ये भरधाव व्हॅनने दोघांना उडवले; मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात; जमावाकडून व्हॅनची तोडफोड

by Team Satara Today | published on : 24 March 2026


कराड : शहरात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात व्हॅन चालवून दोघांना उडवले. यावेळी नागरिकांनी पाठलाग करून व्हॅन अडवली व चालकाला बेदम चोप देत गाडी उलटवून तोडफोड केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कृष्णा नाक्यावरून एक व्हॅन सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात मंगळवार पेठेकडे निघाली होती. या व्हॅनने सुरूवातीला सुरय्या शिकलगार (रा. मंगळवार पेठ, कराड) या महिलेला धडक दिली. त्यामध्ये महिला गंभीर जखमी होवून रस्त्याकडेला फेकली गेली.

अपघातानंतर चालकाने व्हॅन न थांबवता कन्या शाळेकडे पळ काढला. त्यावेळी दुचाकीस्वार माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे (रा. बुधवार पेठ, कराड) यांनाही व्हॅनची धडक बसली. अपघातात तेही गंभीर जखमी झाले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी व्हॅनचा पाठलाग करून कन्या शाळेनजीक व्हॅन अडवली. त्यांनी चालकाला चांगलेच फैलावर घेतले. त्यावेळी मद्यधुंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला चोप देत नागरिकांनी व्हॅनची तोडफोड केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी व्हॅन चालक अक्षय संभाजी शेवाळे (वय 30, रा. शेवाळेवाडी-उंडाळे, ता. कराड) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी घ्या; प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करा - दलित महासंघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
पुढील बातमी
पाटण तालुक्यातील जळव घाटात भाविकांची पिकअप पलटी; हिवरे येथील महिला ठार तर 22 जण गंभीर जखमी

संबंधित बातम्या