सातारा, दि. 16 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव विकास देशमुख, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, स्थानिक व्यवस्थापन विकास समिती सदस्य अॅड.दिलावर मुल्ला, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विद्यापीठाचे प्र कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. गणेश जाधव, उपप्राचार्य डॉ. टी. डी. महानवर, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य एस. एम. मोटे, वसतिगृहप्रमुख प्रा. किशोर संकपाळ उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. गणेश जाधव यांनी महाविद्यालयातील मुलांसाठी वसतिगृहाची गरज विशद केली. पाच वर्षांपासून बंद असलेल्या वसतिगृहाचे नूतनीकरण करून, ते पुन्हा सुरु केल्याने विद्यार्थांची राहण्याची चांगली व्यवस्था होईल. विद्यार्थी बाहेर अवाजवी पैसे देऊन पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना महाविद्यालयातच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाल्याने, चांगले वातावरण लाभेल. ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना हे वसतिगृह भौतिक सुविधांसह उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व गरजा जाणून घेतल्या. त्यानंतर वसतिगृहाची पाहणी केली. त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक करत, भविष्यात उत्कृष्ठ सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. विकास देशमुख यांनी वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेऊन, काही सूचना केल्या. याप्रसंगी प्राध्यापक, विभागप्रमुख व वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते. वसतिगृहाच्या नूतनीकरणात प्रा. किशोर संकपाळ, उपप्राचार्य एस. एम. मोटे, बी. एन. नरळे, कार्यालय प्रमख अशोक मसणे, जे. के. कोरे यांचे योगदान लाभले.