कोंडवे परिसरात युवकांवर गोळीबार

एक्टिवा मोपेडवरून आलेल्या अज्ञातांनी केले फायरिंग; सातारा शहरात खळबळ

by Team Satara Today | published on : 27 January 2025


सातारा : दुपारी साडेतीनच्या दरम्यान कोंडवे, समर्थ नगर येथील पेट्रोल पंप परिसरात एक्टिवा मोपेडवरून आलेल्या दोन युवकांनी सातार्‍याकडे जाणार्‍या दुसर्‍या दोन युवकांवर गोळीबार केला. या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे.

श्रेयश सुधीर भोसले (वय 25 रा. तमजाईनगर) व अमर गणेश पवार (वय 23 रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी गोळीबारामध्ये जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा तात्काळ ऍक्शन मोडवर आली. सातार्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. गेल्या दहा दिवसातील गोळीबाराचा हा दुसरा प्रकार आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची दोन पथके संबंधितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी कास येथील हॉटेलमध्ये छमछमची पार्टी आयोजित करुन नंगानाच घालण्यात आला होता. त्याचवेळी दोन गटात वादावादी होवून धुमश्चर्क्री उडाली होती. एवढी गंभीर घटना घडून गेल्यानंतरही त्याबाबत त्यानंतर कुठेही अवाक्षर बाहेर निघाले नव्हते. मात्र छमछमचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि बभ्रा झाला. यानंतर पोलिसांनी सर्व माहिती घेवून अखेर छमछम पार्टीनंतर पाच दिवसांनी गुन्हा दाखल केला. मटका किंग, रेकॉर्डवरील सराईतांचे बिंग फुटल्याने व त्या पार्टीवेळी एका गटाने दुसर्‍या गटाला बदडल्याने त्यांच्यामध्ये राग कायम होता.

सोमवारी दुपारी छमछम पार्टीतील संशयित आरोपींची मेढा पोलीस स्टेशनला हजेरी होती. हजेरी झाल्यानंतर ते सातारकडे परत येताना यामधील काही युवकांचा दुचाकीस्वरांनी व कारमधील एका टोळीने पाठलाग केला. कोंडवे येथील रस्त्यावर त्यांना ओव्हरटेक करून दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्यावर दुपारी 4 वाजता गोळीबार केला. त्यांनी हातातील पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले. मात्र, सुदैवाने अमर व श्रेयस या गोळीबारातून थोडक्यात बचावले. मात्र गोळी चाटून गेल्याने दोघेही जखमी झाले. पुढे स्विफ्ट गाडी आडवी असल्याने हल्लेखोर त्या परिस्थितीचा फायदा घेऊन तेथून पसार झाले. भरदिवसा गोळीबारीची घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ, व्यवसायिक व वाहनचालकांची तारांबळ उडाली आणि भितीचे वातावरण निर्माण झाले.

गोळीबाराची घटना सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पेट्रोल पंपावरील कॅमेर्‍यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सुद्धा या प्रकाराची माहिती घेत घटनास्थळाला भेट दिली. या कॅमेर्‍यामध्ये विना नंबर प्लेटच्या एक्टिवा गाडीवरून आलेल्या दोन तरुणांनी जखमींवर गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. यानंतर सातारा तालुका पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर आली असून या युवकांच्या शोधार्थ दोन पथके रवाना झाली आहेत.

सातारा शहर परिसरात गेल्या दहा दिवसांमध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे गोळीबारासारखे प्रकार घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या आहेत. जखमींना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबतचा अधिक तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवराज मोरे
पुढील बातमी
दारूचे दुकान फोडून सुमारे लाखभराची रोकड लंपास

संबंधित बातम्या