सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) - महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना, महाराष्ट्र शासनाने 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. सातारा जिल्हा या अभियानाची अंमलबजावणी सुरू करणाऱ्या पहिल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. जिथे ८००० हून अधिक मुलींना आधीच संरक्षण मिळाले आहे. ही राज्यव्यापी चळवळीसाठी एक दमदार आणि महत्त्वपूर्ण सुरुवात असून जिल्हा प्रशासनाने आरोग्य आणि शिक्षण विभागांच्या समन्वयाने, शाळांमध्ये लसीकरण मोहीम आणि पालक जागरूकता सत्रांची सुरुवात केली आहे.
भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दर ८ मिनिटांनी एका महिलेला जीव गमवावा लागत आहे. दररोज सुमारे २०० महिलांचा जीव घेणारा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग आहे. नियमित तपासणी, वेळेवर लसीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार करून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो. सातारा जिल्ह्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई, क्रेडिटॲक्सेस ग्रामीण लिमिटेड, कॅरॅटलैन आणि ब्रिजनेक्स्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर सहाय्यामुळे आतापर्यंत ८ हजारहून अधिक मुलींना यशस्वीपणे सुरक्षित केले आहे. यामुळे एचपीव्ही लसीबद्दल विविध समुदायांचा सहभाग आणि स्वीकारार्हता प्राप्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून आजाराबाबत लवकर जागरूकता, वेळेवर प्रतिबंध आणि ९ ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दूर करणे आहे हा या अभियानाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो तरुण मुलींच्या आरोग्याचे आणि भविष्याचे रक्षण करणाऱ्या, राज्याच्या नेतृत्वाखालील एका व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रारुपाचा पाया रचला जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये 'जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर)' राज्याचा भागीदार आहे. मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणे, प्रत्यक्ष स्तरावर अंमलबजावणी करणे आणि समुदाय एकत्रिकरण करण्यासाठी जीविका फाउंडेशन महाराष्ट्र शासनासोबत काम करत आहे.
सामूहिक लढ्याला बळ द्यावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र' अभियानाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत, असे सांगून आपल्या मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायित्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी सीएसआरच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.