सातारा : शहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. 'सचिन स्क्रॅप सेंटर' असे या दुकानाचे नाव असून, या दुर्घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती अशी की, शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास 'सचिन स्क्रॅप सेंटर'ला अचानक आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, टायर आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट दूरवरून दिसत होते. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, मात्र आगीचा जोर इतका होता की त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते.
घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. भंगार साहित्यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. सुमारे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले होते.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.